Mumbai Rains : मुंबईतील 3 दुर्घटनांमधील मृतांची संख्या वाढली, आतापर्यंत 25 बळी
मुंबई: मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. इथं बचावकार्य अजूनही सुरु आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.