Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain News : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) मुंबईसह (Mumbai) परिसरात गेल्या तासाभरापासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
120 मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह मुंबई पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील 120 मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर,विलेपार्ले सांताक्रुझ,वांद्रे या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. काही वेळ जर असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात होणार आहे. भिवंडी शहरात व तालुक्यात विजाच्या कडकडात ढगाच्या गडगडात जोरदार पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाने भिवंडी शहर व तालुक्यात विजांच्या कडकडात ढगांच्या गडगडात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. संध्याकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून यावेळी नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.