Mumbai : काय आहे CJ's House प्रकरण? ईडी चौकशीनंतर Praful Patel यांची काय प्रतिक्रिया? ABP Majha
सीजे हाऊस प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. या अगोदर ऑक्टोबर 2019 ला ईडीनं प्रफुल्ल पटेल यांची तब्बल 12 तास कसून चौकशी केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पटेल ईडी कार्यालयात गेल्याची माहिती समोर येत आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संशयावरुन चौकशी झाली होती. प्रफुल्ल पटेल यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स आणि इक्बाल मिर्चीचा मुलगा असिफ यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. असिफ मेमनच्या अकाऊंटवरुन काही कोटींची ट्रान्झॅक्शन्स पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्समध्ये झाल्याचा संशय आहे. इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा आणि मुलगा असिफ आणि जुनैदच्या यांच्या नावे सीजे हाऊस इमारतीत खरेदी केलेल्या प्रॉपर्टीच्या बदल्यात असिफनं पैसे मिलेनियम डेव्हलपर्सला दिल्याचा संशय आहे.
सीजे हाऊस ही वरळीतली हायप्रोफाईल सोसायटी आहे.. जी पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने विकसित केल्याची ईडीची माहिती आहे. ईडी चौकशीनंतरही इक्बाल मिर्चीसोबत मिलेनियमनं कुठलेही आर्थिक व्यवहार केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलं होतं. मिर्ची कुटुंबाला सीजे हाऊसमध्ये दिलेली प्रॉपर्टी ही भाडेकरु कायद्याच्या अंतर्गत असलेल्या अधिकारांमुळे दिल्याचा पटेल यांचा दावा आहे.
सीजे हाऊसच्या जागी एम.के.मोहम्मद हे भाडेकरु होते. ते हॉटेल चालवायचे ज्याचे अधिकार इक्बाल मिर्चीच्या कुटुंबानं विकत घेतले होते असा पटेल यांनी दाला केला होता. तर 1990 मध्ये इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन यांनी एम.के.मोहम्मद यांच्याकडून विकत घेतल्याचा दावा आहे.
2007 मध्ये ही प्रॉपर्टी हजरा मेमन, असिफ आणि जुनैदच्या नावे रजिस्टर करण्यात आल्याचीही माहिती आहे.