Mumbai Crime | मुंबईच्या विक्रोळीत 1800 किलो गांजा जप्त
मुंबई : मुंबई पोलिसांनी अशा एका गँगचा पर्दाफाश केला आहे, जी दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करत होती. काही लोक गांजा मुंबईत पोहोचवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मिळाली होती. यानंतर घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एका ट्रकला अडवला. त्यात नारळ भरले होते. तपासादरम्यान समोर आलं की, आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली जात, त्यात त्यांनी 1800 किलो गांजा लपवला होता. या जप्त केलेल्या गांजाची किंमत साडे तीन कोटी रुपये आहे. मुंबई क्राईम ब्रान्चच्या सहआयुक्त मिलन भारंबे यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आकाश यादव आणि दिनेश सरोज या दोघांना अटक केली आहे, जे ट्रकमध्ये गांजासोबत होते. आकाश यादवविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस सध्या संदीप सातपुते आणि लक्ष्मी प्रधान यांचा शोध घेत आहेत. संदीप सातपुते हा भिवंडीतील एका गोदामाचा मालक असून तो ठाण्याच्या लुईस वाडी परिसरात राहतो. तो जवळपास पाच वर्षांपासून अशाचप्रकारे गांजाचा पुरवठा करत आहे.