Mumbai : 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील होणार,सील इमारतीच्या गेटवर पोलीस तैनात करणार

Continues below advertisement

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. तिसऱ्या लाटेसाठी नियमांची कडक अंमलबजावणीचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

 

सील इमारतींबाबत निर्देश

 

ज्या इमारती सील करण्यात येतील, अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. तसेच  इमारतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही. इमारत सील करण्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवली जावी यासाठी सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

 

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई 

 

 

मास्क न लावणाऱ्यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी सर्व 24 प्रशासकीय विभागांना दिले आहेत. या अनुषंगाने आवश्यक तेवढ्या अधिक क्लीन-अप मार्शलची तात्पुरती नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांद्वारे करण्यात येत असलेली 'विना मास्क' विषयक कारवाई देखील अधिक तीव्र करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी मुंबई पोलीस दलास दिल्या आहेत. या अनुषंगाने मनपा क्षेत्रात दररोज अधिकाधिक व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याची सूचना केली आहे.   

 

कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्रकारच्या कोविड विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने सर्व रुग्णालयांमधील आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा, जसे की, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेऊन संभाव्य गरजेनुसार अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

 

मुंबई महानगरपालिकेच्या ज्या रुग्णालयांमध्ये व जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, त्यांच्या क्षमतेची चाचणी घेण्याचे व रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे व योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

 

कोविड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने तसेच कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात 266 कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तरी ज्यांना कोविडची लक्षणे असतील, त्यांनी कोविड चाचणी केंद्रात जाऊन कोविड चाचणी करुन घ्यावी. तसेच सील इमारतींमधील व्यक्तींची देखील टप्प्या-टप्प्याने कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या अनुषंगाने आपल्या विभागातील कोविड चाचणी केंद्राची माहिती वॉर्ड वॉर रुमद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी संबंधीत नागरिकांनी आपल्या विभागाच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा.       

 

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम)अद्ययावत करण्याचे निर्देश दिलेत. या अंतर्गत प्रामुख्याने तेथील मनुष्यबळ, तांत्रिक सेवा-सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram