Mumbai Local | सर्वासामान्यांसाठी लोकल धावली, मुंबईकर खूश
मुंबई : मागील 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आहे. मागील 10 महिन्यांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं मुंबई लोकल सुरु केली होती. मात्र सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता. पण आजपासून मात्र ठराविक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, तर दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र वेळेचं बंधन तोडल्यास मुंबईकरांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे.
आजपासून मुंबई लोकल (Mumbai Local) ची दारं सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाकडूनही सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.