Mumbai Diamond Market Shifted In Surat:अशी ही 'हिरा'फेरी;हिरे बाजारावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
बुलेटिनच्या सुरूवातीलाच बातमी, गुजरातने महाराष्ट्राला दिलेल्या आणखी एका मोठ्या धक्क्याची... अनेक मोठमोठ्या कंपन्या, आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र, एनएसजी तसेच मरिन पोलीस अकॅडमी महाराष्ट्रातून गुजरातला पळवल्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले. मात्र आता त्यात आता आणखी एक भर पडलीय. महाराष्ट्राची शान आणि जगभरात ख्याती असलेला हिरे बाजारही गुजरातला जाण्याची शक्यता आहे. कारण, सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी तब्बल ३ हजार ४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये उभारलंय. महत्त्वाचं म्हणजे, या इमारतीने अमेरिकेच्या पँटागॉन इमारतीलाही मागे टाकत, जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा मान पटकावलाय. गुजरातमध्ये उभारलेल्या या सूरत डायमंड बोर्समुळे आणि त्यातील सुविधांमुळे मुंबईतील हिरे व्यापारी मोठ्या संख्येने सूरतला स्थलांतरित होतायत. त्यामुळे, महाराष्ट्राला रोजगाराबाबत आणि करांबाबत मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय.