CSMT Station : 'सीएसएमटी' रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, विमानतळाच्या धर्तीवर सर्व सोयीसुविधा मिळणार
मुंबई : मायानगरी, अर्थात देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटी रेल्वे स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे. येत्या काळात या स्थानकाला मॉलचं स्परुपही येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी अदानी रेल्वेसह इतर 9 कंपन्या शर्यतीत असल्याचं म्हटलं जात आहे. या स्थानकाला खरंच मॉलचं स्वरुप येणार हा हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अदानी, गोदरेज, कल्पतरु पॉवर्स यांसारख्या कंपन्या या स्थानकाच्या पुनर्विकासासाठीच्या शर्यतीत आहेत. लवकरच या कंपन्यांना सदर बाबतीतचं टेंडर देण्यात येणार आहे. 1608 कोटी रुपयांचं हे टेंडर असणार असून, 60 वर्षांच्या भाडे तत्त्वावर हे करारपत्र करण्यात येणार आहे.
स्थानकाच्या दर्शनीय भागात एक गॅलरी तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये विमानतळावर देण्यात येणाऱ्या सुविधा दिल्या जातील असं कळत आहे. लवकरच यासाठीच्या कामाला सुरुवात होणार असून, कोणत्या कंपनीला यासाठीचं कंत्राट देण्यात येतं आणि नेमका हा कायापालट कसा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
स्थानकात 18 नंबरच्या फलाटावर आलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी एक व्यवस्था करण्यात येणार आहे. तिकीटविक्री सुरु असणाऱ्या सध्याच्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी करण्यात येणार असून हा जागतिक ठेवा सर्वांना दाखवण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे.