Mumbai Car Accident : सायन हॉस्पिटलच्या डीनच्या कारची महिलेला धडक, महिलेचा जागेवरच मृत्यू
मुंबई : पुणे हिट अँड रनची घटना ताजी असताना मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायन हॉस्पिटलचे डीन राजेश ढेरे यांचा कारने महिलेला धडक दिली. या अपघातात एका 60 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रुबेदा शेख, वय 60 वर्ष ही महिला काल सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेली होती. मात्र संध्याकाळी साडेआठच्या सुमारास उपचार घेऊन हॉस्पिटलच्या गेट नंबर 7 मधून बाहेर येत असताना त्यांचा अपघात झाला. महिला सायन हॉस्पिटलचे डीन राजेश ढेरे यांच्या कारने हॉस्पिटलच्या आतमध्ये जाताना महिलेला धडक दिल्याने अपघात होऊन महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
सायन हॉस्पिटलच्या डीनच्या कारची महिलेला धडक
सायन पोलिसांनी सकाळी अकरा वाजता महिलेचा मुलाला या घटनेबद्दल माहिती दिली. मृत रुबेदा शेख यांचा मुलगा सहनावाज शेख यांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा, असा आरोप करत मागणी केली होती. त्यानंतर सायन पोलिसांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करत डॉ. राजेश ढेरे यांना अटक केली आहे.