Raj Thackeray Pet dog James died : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लाडका श्वान जेम्सचं निधन

Continues below advertisement

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या जेम्स नावाच्या श्वानाचं सोमवारी (28 जून) रात्री निधन झालं आणि त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: मुंबईतील परेलमधील प्राण्यांच्या स्मशानभूमीत उपस्थित होते. यावेळी लाडक्या जेम्सला निरोप देताना राज ठाकरे भावूक झालेले दिसले.

राज ठाकरे यांच्या जेम्स या श्वानाचं वय साडेबारा वर्ष होतं. मागील काही दिवसांपासून त्याला चालायला त्रास होत होता. वयोमानानुसार सोमवारी रात्री त्याचं निधन झालं. राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब श्वानप्रेमी आहे. त्यामुळेच लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. 

राज ठाकरे यांच्याकडे तीन श्वान होते. बॉण्ड, शॉन आणि जेम्स अशी त्यांची नावं होती. काही वर्षांपूर्वी बॉण्ड आणि शॉन यांचं निधन झालं होतं. शॉन कॉनरी हा राज ठाकरे यांचा हॉलिवूडमधील आवडता अभिनेता होता. त्याने जेम्स बॉण्ड हा चित्रपट केला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन श्वानांची नावं जेम्स आणि बॉण्ड अशी ठेवली होती. तर तिसऱ्या श्वानाचं नाव शॉन असं ठेवलं होतं. 

त्यातल्या जेम्सचंही निधन झाल्याने संपूर्ण ठाकरे कुटुंब गहिवरलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सार्वजनिकरित्या आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. परंतु लाडका श्वान जेम्सला अखेरचा निरोप देताना ते भावूक झाले. त्यामुळे ते कॅमेऱ्यापासून दूर झाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram