Metro 2A & 7 : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक 25 टक्क्याने कमी होईल : MMRDA आयुक्त आर ए राजीव
मुंबई : मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. येत्या ऑक्टोबर महिन्यात पहिला टप्पा सुरु होईल, असं सांगितलं जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होते. तर मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन केलं.
"आजचा क्षण ऐतिहासिक आहे. 2014 मध्ये पहिली मेट्रो सुरु झाली होती, त्यानंतर लगेच आपण मेट्रो 2A आणि मेट्रो 7 कडे वाटचाल करत आहोत, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिली. "दोन्ही मेट्रो मार्गावर दररोज एकूण 12 लाख प्रवासी प्रवास करु शकतील. या मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक 25 टक्क्याने कमी होईल. ऑक्टोबरमध्ये पहिला टप्पा सुरु करण्यात येईल, जो 20 किमी असेल. उर्वरित टप्पा जानेवारी 2022 मध्ये सुरु केला जाईल. या मेट्रोला चालकाची गरज नाही, मात्र सुरुवातीला काही दिवस चालक असेल," असंही त्यांनी सांगितलं.