Kidnapping Gang Fake Video : कांजूरमार्ग परिसरात अपहरण झालं नाही, व्हायरल झालेला व्हिडिओ फेक
गेल्या दोन दिवसांपासून HDIL प्रीमियर कोहिनूर, कांजूरमार्ग या रहिवासी सोसायटीमधून आणि विक्रोळीच्या मुंबई महापालिकेच्या शाळेतून दोन लहान मुलांचं अपहरण झालं असल्याच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं विक्रोळी पार्कसाईट, कांजूरमार्ग आणि घाटकोपर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे चौकशी करून या घटनेची शहानिशा केली. पण या परिसरातून कोणाचंही अपहरण झालेलं नाही. संबंधित पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक रहिवाशांकडे याबाबत चौकशी केली आहे. पण अपहरणाबाबतची कोणतीही तक्रार परिमंडळातील पोलीस ठाण्याला आजवर प्राप्त झालेली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अपहरणाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. पण सदरच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप फेक आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.