Chandrapur : पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याच्या मुद्द्यावर घुमजाव, पेट्रोलियम मंत्री म्हणतात...
चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बारा तासाच्या आत घुमजाव केले. भाजपच्या काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात चंद्रपुरात वार्षिक वीस मिलियन मेट्रिक टनाची रिफायनरी उभारण्याची घोषणा त्यांनी ठामपणे केली होती. मात्र आज पत्रपरिषदेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही असे सांगत धक्का दिला. याआधी दिल्ली येथील रोहींग्याना घरे देण्याच्या मुद्द्यावर देखील शहरी आवास मंत्रालय सांभाळणाऱ्या पुरी यांच्याविषयी वाद झाला होता. महाराष्ट्रात नाणार रिफायनरी एक मोठा राजकीय मुद्दा झाला आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने रिफायनरी रेंगाळली आहे. राज्यात नवे सरकार पदारूढ झाले आहे मात्र ठोस निर्णय होत नसताना नाणारची क्षमता विभागून 3 ठिकाणी रिफायनरी उभारण्याचे प्रयत्न प्राथमिक स्तरावर होत आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर सर्व प्रकारच्या प्रदूषणात देशात अग्रस्थानी असताना रिफायनरीची थेट घोषणा पुरी यांच्या घुमजाव चे मुख्य कारण मानले जात आहे.