Petrol Diesel Price : मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं होणारी वाढ आज, मंगळवारीही सुरुच आहे. तेल कंपन्यानी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनुक्रमे 24 आणि 25 पैशांनी वाढ झाली आहे. ही वाढ प्रति लीटरच्या दरांमध्ये झाली. एका महिन्यात आतापर्यंत दरवाढ होण्याची ही 13 वी वेळ आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे.
मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठयावर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल आज 22 पैशांनी वाढलं आहे, तर डिझेलच्या दरात 27 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 99.75 रुपये आहे तर डिझेल 99.61 रुपये आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 93.44 रुपये आणि डिझेलची किंमत 84.32 रुपये प्रति लीटर झाली आहे. Indian Oil Corporation च्या संकेतस्थळावरून यासंदर्भातील माहिती मिळत आहे.
मुंबईतच नव्हे तर, नाशिकमध्येही पेट्रोलच्या दरांनी शंभरीचा आकडा गाठला आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 100.19 रुपये आणि डिझेलचे दर 90.63 वर पोहोचले आहे. तर तिथे परभणीमध्ये पेट्रोल दर 102. 09 रुपये तर डिझेल दर 92.46 इतक्या उंचीवर पोहोचले आहेत.
4 मे पासून सुरू झालेल्या इंधन दरवाढीचा सिल्सिला आज 26 मे रोजी ही सुरूच आहे पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि या इंधन दरवाढीला सुरुवात झाली.मागच्या 22 दिवसांत पेट्रोल हे 2 रुपये 74 पैश्यांनी तर डिझेल हे 3 रुपये 4 पैश्यांनी महाग झाले आहे. केवळ पेट्रोलच नाही तर डिझेलच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा थेट परिणाम होत आहे त्यामुळे सामान्य प्रवासी वाहतूक असो अथवा ट्रांसपोर्टेशन कृषी मालवाहतूक असो या सर्व बाबींचे दर वाढले आहेत.सर्वसामान्य नागरिकांकडून हे दर कमी करण्याची मागणी होत असतानाही दर कमी केले जात नाहीयेत उलट हे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत त्यामुळे अगोदरच लॉकडाऊन आणि कोरोना मुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.
कोलकात्यामध्ये 93.49 रुपये आणि डिझेल 87.16 0रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. तर राजस्थानमध्ये पेट्रोल 104.42 रुपये आणि डिझेल 97.18 रुपये प्रित लीटर झालं आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी उंची गाठली आहे.