इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला!

Continues below advertisement

मुंबई : मुंबईतील दादरच्या इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. निमंत्रणावरुन नाराजी, प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती यामुळे पायाभरणीचा आजचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. परंतु या पायाभरणी सोहळ्याची पुढची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी साडेतीन वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार होता. परंतु या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन नाराजीचे सूर उमटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला फक्त 16 जणांना निमंत्रण देण्यात आलं होतं. बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, आंबेडकरी चळवळीचे नेते यांची नावं आमंत्रितांमध्ये नव्हती. शिवाय मंत्रिमंडळातील अनेकांना आजच्या कार्यक्रमाची माहिती नव्हती. यानंतर अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं.


परंतु निमंत्रणावरुन सुरु झालेली नाराजी, प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती यामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. सर्वांना सोबत घेऊन, सगळ्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रमा पाड पडावा यासाठीच आजचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाची रुपरेषा आणि पुढची तारीख जाहीर होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram