Kanjurmarg Metro Car Shed | मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानेच मेट्रो मध्ये मिठाचा खडा पडला : फडणवीस
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. या निर्णयानंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. इगो सोडा, आरेमध्ये काम सुरू करा, आम्ही टीका करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले की, मी कालच सभागृहात यावर बोललो होतो, केवळ इगो करता निर्णय घेतला होता. अतिशय बेसिक मुद्दा आहे की समजा जर जमीन क्लियर असली तरी मेट्रो बांधायला 4 वर्ष उशीर होणार आहे. पण जमीन वादातीत आहे. राज्य सरकार हा अट्टाहास का करत आहे ? असा सवाल त्यांनी केला.
आपला इगो सोडा, सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे, मेट्रो वेळेत धावू लागेल. राज्य सरकारला अक्षरशः चपराक दिली आहे. मुख्यमंत्री यांना चुकीचे ब्रिफिंग केलेलं आहे. मुख्यमंत्री यांच्या निर्णयानेच मेट्रो मध्ये मिठाचा खडा पडला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, कंजूरमार्ग कार शेड जरी गेलं तरी आरेमध्ये काम करावंच लागणार आहे. कोणाच्या भरवशावर हे चाललं आहे? जनतेचे हे पैसे आहेत. राज्य सरकारने आरेमध्ये काम सुरू करावे, आम्ही कोणतीही टीका करणार नाही, असं ते म्हणाले.