Corona Vaccination : तरुणांच्या लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचा मेगाप्लान

Continues below advertisement

मुंबई : उद्यापासून (21 जून) देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होणार आहे. या लसीकरण मोहीमेसाठी मुंबई महानगरपालिकेनं एक मेगा प्लान तयार केला आहे. फेरीवाले, रिक्षाचालक यांसारख्या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. तर आठवड्यातील तीन दिवस वॉक-इन लसीकरणासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. या दिवशी लसीकरण केंद्रांवर 100 टक्के वॉक-इन लसीकरण केलं जाणार आहे. 

पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला संबोधित करताना 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याबाबत घोषणा केली होती. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मेगा प्लान तयार केला आहे. या प्लानमध्ये मुंबई महानगरपालिकेनं वॉक-इन लसीकरणासाठी आठवड्यातील तीन दिवस राखून ठेवलेले आहेत. तरुणांसाठी वेगवान लसीकरण मोहीम राबवली जावी, यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस वॉक-इन लसीकरणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या दिवशी 100 टक्के वॉक-इन लसीकरण केलं जाणार आहे. तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी काही टक्के रजिस्ट्रेशन तर काही टक्के वॉक-इन स्वरुपात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. 

लसीकरणाच्या मेगाप्लानमध्ये व्यावसायानुसार जे सुपर स्प्रेडर ठरू शकतात, म्हणजेच, फेरीवाले, रिक्षाचालक किंवा आतापर्यंत लसीकरण झालेले नाहीत असे बेस्ट बसचे कर्मचारी यांचं लसीकरण प्राधान्य क्रमाने करता येईल का? याबाबत मुंबई महापालिकेचा विचार सुरु आहे. तसेच 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठीही काही ठराविक वयोगटांचे टप्पे केले जातील. 30 ते 44 किंवा 25 ते 44 असे वयोगटाचे टप्पे करुन लसीकरण मोहीम राबवली जाऊ शकते. या वयोगटातील व्यक्तींनाही वॉक-इन लसीकरणात प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामुळे वेगवान लसीकरण मोहीमेसाठी वॉक-इन लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. 

दरम्यान, 21 तारखेपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहीमेसाठी केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला 8 लाख 70 हजारांहून जास्त लसींचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांतील डोस पाहिले तर गेल्या महिन्यात 4 लाख आणि त्यापूर्वीच्या महिन्यात 8 लाख 70 हजार लसीचे डोस मुंबई महापालिकेला मिळाले होते. मात्र आता जर तरुणांचं लसीकरण सुरु होणार असेल तर लसीच्या डोसचं प्रमाणंही वाढलं पाहिजे, अशी मुंबई महापालिकेची अपेक्षा आहे. आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत होता. खाजगी सेंटरवर हजारो रुपये मोजून काहींनी लस घेतली होती. सोमवारपासून सुरु होणारा लसीकरणाचा टप्पा हा सर्वात मोठ्या लोकसंख्येचा टप्पा आहे. याच नागरिकांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेनं हा मेगाप्लान तयार केलेला आहे. यामध्ये गरजेनुसार आणि वेळेनुसार आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram