CIDCO: सिडकोकडून मोठी घोषणा... नवी मुंबई, पनवेलमध्ये लवकरच 89 हजार घरांची बंपर लॉटरी
नवी मुंबई : सिडकोकडून (Cidco) नवी मुंबई, पनवेलमध्ये लवकरच 89 हजार घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. (Big announcement from CIDCO, bumper lottery of 89 thousand houses in Navi Mumbai, Panvel soon) सिडको एमडी संजय मुखर्जी यांनी याबाबत घोषणा केली असून नवी मुंबई, पनवेल, उरण भागात घरांची निर्मिती होणार आहे. दरम्यान आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 100 घर लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले.
येत्या काळात सिडकोकडून 89 हजार घरांची बंपर लॉटरी काढणार असल्याचे यावेळी सिडको एमडी संजय मुखर्जी यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे 1 लाख 4 हजार घरांची निर्मिती सिडको येत्या काळात करणार आहे.
सिडकोकडून 15 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. मात्र गेली दोन वर्ष झाले प्रकल्प रखडल्याने लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. एकीकडे घरांचे हप्ते सुरू, दुसरीकडे घर मिळण्यास लागणारा विलंब तर तिसरीकडे राहत्या घराचे भाडे अशा विवंचनेत सिडकोचे घर लाभार्थी अडकले होते. अखेर राज्य सरकारने हस्तक्षेप करून कोरोना काळात लोकांना घरांचा ताबा देण्याचा आदेश सिडकोला दिल्यानंतर आजपासून घरवाटप सुरू झाले. कळंबोली येथील गृह प्रकल्पातील 100 घर लाभार्थ्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले.
दरम्यान सिडकोने कोरोना काळात घरांच्या चाव्या दिल्याबद्दल लोकांकडून समाधान व्यक्त केले असले तरी लावलेले जादा शुल्क माफ करण्याची मागणी घर लाभार्थ्यांनी केली आहे.