Central Railway : पाचवी-सहावी मार्गिका एप्रिलपर्यंत पूर्ण? 15 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प कधी पूर्ण?
गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. या मार्गिका सुरू करण्यासाठी पहिला जम्बो मेगाब्लॉक आज घेण्यात येतोय. या जम्बो मेगाब्लॉकच्या दरम्यान दिवा आणि ठाणे या स्थानकांमध्ये ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा जम्बो मेगाब्लॉक सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला असून आणि संध्याकाळी सहाला संपेल. या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने विशेष बसची सुविधा दिली आहे. याप्रमाणे आणखीन सहा जम्बो मेगाब्लॉक येणाऱ्या काळात घेण्यात येणार आहेत. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 24 ते 72 तासांचे मेगा ब्लॉक घेऊन काम पूर्ण केले जाणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे. आज जे काम सुरू आहे त्यात अप धीमी मार्गिका 1 मीटर सरकवण्यात येणार असून सिग्नल यंत्रणेचे काम करण्यात येईल.