मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्ष शिल्लक आहेत, परंतु सर्वच पक्षांनी त्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा सूर आळवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुनच निवडणूक लढवावी असा विचार मांडला आहे. विशेष म्हणजे मुंबईत संघटना मजबूत करण्यासाठी आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे लक्ष घालणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम दोन वर्ष आधीच वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपने मिशन मुंबई अंतर्गत रणनीती आखली आहे. तर शिवसेनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बीएमसीमधील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढावी असं म्हटलं आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक आघाडीतच लढवावी अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.