Aryan Khan Bail Granted : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अखेर जामीन मंजूर : ABP Majha
मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलासा दिला आहे. आर्यन खान प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकालाची प्रत उद्या येणार असल्याने आजची रात्र आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. आर्यन खान उद्या तुरुंगाच्या बाहेर येणार आहे.
गेल्या 25 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनासाठी शाहरुख खानने खूप प्रयत्न केले असून त्यासाठी आतापर्यंत तीन वकील बदलले आहेत. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले असून तो सर्वसामान्य मुलगा असता तर हे प्रकरण एवढं वाढलच नसतं असही वकिलांनी कोर्टाला सांगितलं. आर्यन खानला या प्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवर एनसीबीने 2 ऑक्टोबरला धाड टाकली होती. यावेळी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मूनमून धमेचाच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली.
दरम्यान, आर्यनच्या जामिनाला एनसीबीचा विरोध केला होता. गुणवत्तेच्या आधारावर आर्यनच्या जामिनाची याचिका फेटाळून लावण्याची एनसीबीच्या वकिलांनी मागणी केली होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल असा दावा एनसीबीच्या वतीनं करण्यात आला होता. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयानं दखल घेऊ नये अशी विनंती एनसीबीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती.