समाजकंटकांनी तलावात विष कालवलं, लाखो मासे मृत, भिवंडीतील घटना
Continues below advertisement
गावकीच्या शिव कालीन तलावात अज्ञात समाजकंटकांनी विष कालवून तलावातील लाखो मासे मारण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील अनगाव परिसरामधील असलेल्या शिव तलावात घडली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तलावात विष कालवणाऱ्या अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. भिवंडी तालुक्यातील अनगाव ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक गावकीचा शिव कालीन मोठा तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मत्स्य पालन करून त्यावर गावातील तरुणांची उपजीविका चालते. विशेष म्हणजे दर वर्षी या तलावातील मत्स्य पालन करण्यासाठी लिलाव करण्यात येतो . या वर्षीचा लिलाव गावातील २० तरुणांनी मिळून घेतला आहे. मात्र काही समाजकंटकांची नजर तलावातील लाखो माश्यावर पडल्याने लिलाव घेणाऱ्या तरुणांचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने तलावात विषारी औषध टाकल्याचा आरोप शिवसेनेचे भिवंडी ग्रामीण उपतालुका प्रमुख नितीन जोशी यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील चार महिन्यात तलावात विषारी औषध टाकण्याची ही चौथी घटना आहे. तर या तलावाच्या लगतच गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. त्यामुळे तलावात टाकलेले विष या टाकीतही जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार यापूर्वीही दाखल करण्यात आली असून या समाजकंटकाना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तर तलावाची मृत मासे व पाणी तपासणीसाठी फॉरेन्सी लॅबमध्ये पाठवल्याचेही सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement