Electricity bill | तुम्हीच मीटर रिडींग घ्या आणि वीज बिल भरा; उर्जामंत्री नितीन राऊत यांचं आवाहन
मुंबई : वीज बिलाचा मुद्दा मागील वर्षभरापासून चांगलाच तापत आहे. त्यातच आता थेट राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
वीज वापराचं मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या 'ब्रेक दि चेन'च्या निर्बंधांमुळे वीज कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या वीज वापराचं प्रत्यक्ष रिडींग घेण्यावर निर्बंध येणार आहेत, याच पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी हे आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे. तसंच महावितरणनंही वीज ग्राहकांच्या तक्रारी तातडीनं सोडवाव्यात, त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी यासाठीची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी ग्राहक निवारण यंत्रणेला अलर्ट राहण्याचे निर्देशही राऊत यांनी दिले आहेत. 'एबीपी माझा'शी संवाद साधताना राऊत यांनी नागरिकच आमचा राजा आहे, असं म्हणत त्यांना हे आवाहन केलं.
मागील लॉकडाऊन काळात जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी चित्र होतं. ज्यामध्ये अनेक ग्राहकांना त्रास झाला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये आणि ग्राहकांना त्रास होऊ नये, कारण ग्राहक हा आमचा राजा आहे, आमचं दैवत आहे. त्यामुळं ग्राहकांचं हित जोपासणाऱ्या गोष्टींसाठी हातभार लावण माझं काम आहे, असं नितीन राऊत म्हणाले.