Yogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतला
Yogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतला
भाजप नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh) यांचे अपहरण आणि हत्येच्या घटनेबाबत तपासात अनेक खुलासे समोर येत आहेत. सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांचे विविध पथक तपास करत होते. पोलिसांनी या प्रकरणात आता मोठी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सतीश वाघ (Satish Wagh) यांचं अपहरण व खून या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्या व्यक्तिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस आयुक्तांनी दिली घटनेची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून "वैयक्तिक" कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश वाघ यांना मारण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. सतीश वाघ (Satish Wagh) यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खून हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी 5 पैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ (Satish Wagh) यांच्या खुनाची सुपारी दिली, त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेच्याबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.