भ्रष्टाचाराच्या आरोपात कशामुळे अडकले अनिल देशमुख? देशमुखांची मुंबई आणि रायगडमधील संपत्ती जप्त
मुंबई : सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. यासंदर्भातील माहिती ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते. तसेच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या जप्त संपत्तीमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
मुंबईतील वरळी येथील 1.54 कोटी रुपये किमतीचा फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील 25 प्लॉट्स यांचा जप्त केलेल्या मालमत्तेत समावेश आहे. ईडीने बजावलेल्या समन्समध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आता त्यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई समोर आली आहे. गैरव्यवहार आणि भष्टाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख यांची आणि कुटुबियांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. यात आता पहिल्यांदाच ईडीने कारवाई करत देशमुख कुटुंबाची मालमत्ता जप्त केली आहे.