Ustad Zakir Husaain passed Away : वयाच्या 73व्या वर्षी झाकीर हुसैन यांचं निधन
Ustad Zakir Husaain passed Away : वयाच्या 73व्या वर्षी झाकीर हुसैन यांचं निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली असून त्यांची प्राणज्योत मालवली आहे. झाकीर हुसैन यांच्या जाण्यानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे यांनी झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच गायक महेश काळे यांनी देखील एबीपी माझाला प्रितिक्रिया दिली आहे. दातृत्व हरपलं - महेश काळे गायक महेश काळे यांनी एबीपी माझसोबत बोलताना म्हटलं की, सुन्न झाल्यासारखं वाटतंय. अमेरिकेमध्ये मी त्यांच्या जवळ राहायचो. दातृत्व हरपल्यासारखं वाटतंय. आमच्या सगळ्यांच्या वडिलांच्या गुरुस्थानी ते होते. त्यांच्या जवळ जरी उभं राहिलं तरी त्यांची उर्जा, खरेपण अनुभवता यायचं. मला माझ्या भावना व्यक्त करत येत नाहीत. ही दिग्गज मंडळी त्यांच्या कलेमुळे कायमच चिरतरुण असतात. तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व - सुरेश तळवळकर ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवळकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, याची मला महिती होती. पण आज झाकीरजी आपल्या नाहीत, ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे. तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व, ज्यांच्यामुळे तबलावाद्याला ओळथ मिळाली. तबल्याची ओळख करुन देण्यात झाकीर हुसैन यांचा फार मोठा वाटा आहे. कलाकाराने प्रसिद्धी मिळाल्यावर कसं असायला हवं याविषयी त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.