UNESCO World Heritage | UNESCO यादीत Salher किल्लाही समाविष्ट,शिवरायांचे किल्ले वैभव आता जागतिक गौरव
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच असलेल्या साल्हेर किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी युनेस्कोच्या शिष्टमंडळाने या गड किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. साल्हेर किल्ल्यासोबतच महाराष्ट्रातील आणखी अकरा किल्ल्यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पताका अधोरेखित करणारे राज्यभरातील बारा दुर्ग किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील साल्हेर हा एक किल्ला देखील आहे. हा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर वसलेला आहे. साधारण समुद्र सपाटीपासून तब्बल १५६७ मीटर म्हणजेच ५१४१ फूट उंची असलेला हा साल्हेर किल्ला आहे. या किल्ल्याला भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असून तो समृद्ध इतिहास आणि पौराणिक कथांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. लोककथेनुसार भगवान परशुरामांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते. या किल्ल्यावर गुजरात, दिल्लीचे सुलतान आणि मुघलांनी देखील राज्य केले होते. या किल्ल्याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. १६७१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण दौऱ्यावर असताना हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर लगेचच मुघलांनी या किल्ल्यावर १२ हजार अश्वसैनिकांसह मोठा हल्ला चढवला होता. या निर्णायक क्षणी महाराजांचे मावळे आणि सैनिक यांनी लढा देत हा किल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतला होता. तेव्हापासूनच या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. अशा या साल्हेर किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. हा किल्ला पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे. संदीप जेजूरकर, एबीपी माझा, साल्हेर, नाशिक.