Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meeting : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meeting : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांची शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती होती. मात्र, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं. यावेळी, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हेही उद्धवठ ठाकरेंच्यासोबत होते. एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबलं जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा झाली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे देखील आज विधिमंडळात आले होते. नागपूरमध्ये येताच सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं. त्यानंतर, ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून शिंदे गटातील नेत्यांमध्ये देखील या भेटीनं आश्चर्य व्यक्त होत आहे.