Tractor Black Box | ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स सक्ती, शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा, कोल्हापुरातून विरोध!

केंद्र सरकारने विमानाप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला GPS आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयाला कोल्हापुरातून थेट विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यासंदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. वेळ पडल्यास ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. देशातील नव्वद लाख ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला हा निर्णय बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक ट्रॅक्टर मालकाला किमान पंचवीस हजारांचा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. अठरा ऑगस्टपर्यंत केंद्राच्या अधिसूचनेवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. ब्लॅक बॉक्स म्हणजे इव्हेंट डेटा रेकॉर्डर (EDR) असून, त्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या वापराची माहिती नोंदवली जाईल. केंद्राने हा अनावश्यक कायदा लागू करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. हे शेतकरी विरोधी धोरण असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मालवाहू ट्रॅक्टरला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून व्हीएलटीडी प्रणाली आणि एक एप्रिल दोन हजार सत्तावीस पासून ब्लॅक बॉक्स बंधनकारक असणार आहे. "दिल्लीत एसी कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत. आमचा बळीराजा शेतात राबतो, महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही. त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणे हा थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा घालण्यासारखेच आहे." अशी भूमिका मांडण्यात आली आहे. शेतीशी निगडीत ट्रॅक्टरना यातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola