
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 02PM : 22 March 2025: ABP Majha
नागपूर: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार आहे. 1992 नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी कोणतीही मोठी घटना घडली नाही. त्यामुळे आता या दंगेखोरांना (Nagpur Riots) आता सरळ केलं नाही तर त्यांना सवय पडेल. त्यामुळे दंगेखोरांवर कारवाई करताना पोलिसांकडून कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. आणखी काही लोकांना अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगल करताना दिसतोय किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस आहेत. मोठ्याप्रमाणावर सोशल मिडिया ट्रॅकिंग करुन ज्या लोकांना दंगल भडकावण्यासाठी चिथावणी दिली, त्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. आतापर्यंत एकूण 68 पोस्ट डिलिट करुन कारवाई करण्यात आली आहे. ज्या लोकांनी भडकावणारं पॉडकास्ट केलं, अफवा पसरवल्या, अशा सर्व लोकांवर कारवाई होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.