Thane Traffic | ठाणे वाहतूक कोंडीवरुन मनसेचा एल्गार, प्रशासनावर हल्लाबोल
ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कामावर जाताना आणि कामावरून घरी परतताना ठाणेकर तासनतास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत मनसेने आवाज उठवला आहे. ठाण्यामध्ये आज मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा 'ट्रॅफिक मोर्चा' काढण्यात आला. पालिकेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. मागच्या काही वर्षांपासून ठाण्याच्या वाहतूक कोंडीची परिस्थिती अतिशय भयानक झाली आहे. वसईवरून ठाण्यात यायला तीन ते साडेतीन तास लागतात, तर भिवंडीवरून अडीच ते तीन तास लागतात. शिवफाटा मार्गे किंवा मुंब्रा मार्गे दोन ते सव्वा दोन तास लागतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काढलेले सरकारी निर्णय (जीआर) देखील निष्फळ ठरले. एका जीआरमुळे एका लहान मुलीला जीव गमवावा लागला. परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाणे शहरातून असूनही ठाणेकरांना याचा फायदा होत नाही, अशी टीका करण्यात आली. "त्यांना ट्राफिक कळतच नाही. त्याच्या मागचं कारण असंय की ते जेव्हा निघतात त्या वेळेला ते प्रोटोकॉलने निघतात. ठाण्यातली सगळी ट्राफिक थांबवली जाते आणि ते सरळ निघून जातात," असे मनसेने म्हटले आहे. पाच हजार फ्लॅटच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जात आहे, परंतु रस्त्यांवरील गर्दीचा विचार केला जात नाही, असेही निदर्शनास आणले आहे.