Milk Price Protest | सांगली, कोल्हापुरात 'स्वाभिमानी' संघटनेचं दूध बंद आंदोलन सुरु
दूध दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झालं. सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्ह्यात दोन ठिकाणी टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडण्यात आलं. तर कोल्हापूरमध्येही आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. इथे भैरवनाथाला अभिषेक घालून आंदोलन सुरु झालं खरं, मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांनी इथेही दूध घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधील दुधाचे कंटेनर रस्त्यावर रिकामी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.