
Suresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर खून खटल्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी हे मंत्री धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनही धनंजय मुंडें अडचणीत आले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सातत्याने करत आहेत. त्यानंतर, आता आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनीही मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: राजीनामा दिला होता, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वत: पाहिलंय की अजित पवारांनी राजीनामा दिला होता. मग, धनंजय मुंडे का देत नाहीत, असा सवालही आमदार धस यांनी उपस्थित केला आहे.
मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सूचवले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढल्याची माहिती आमदार धस यांनी दिली.