Supriya Sule On Baramati : विधानसभेला काँग्रेसला जास्त जागा देणार का,सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या!
Supriya Sule, Pune : "जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याचीही सीट आली असती. दिंडोरीतही पिपाणीला मतं पडली आहेत. हा रडीचा डाव आहे, दुसरं काही नाही. मी दहा वर्षे भाजपचं सरकार पाहिलं आहे", असं बारामतीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती लोकसभेत विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दौंडमध्ये जात लोकांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीबाबत भाष्य केलं. यावेळी त्या बोलत होत्या.
मोठ्या घोषणा देतात आणि नंतर निवडणुकीचा जुमला म्हणतात
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मोठ्या घोषणा देतात आणि नंतर निवडणुकीचा जुमला म्हणतात. मी जवळून पाहिलं आहे. राज्यात स्वायत्त संस्थांचा गैरवापर करण्यात आला. दुधाचा भाव वाढला, महागाई वाढली आहे. विजयानंतर समोरुन शुभेच्छा आल्या तर त्याला आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणत नाहीत. कोणी प्रेमाने शुभेच्छा देत असेल तर अतिशय विनम्रपणे आपण त्या स्वीकारायच्या असतात.
महाराष्ट्रात दुष्काळ, बरोजगारी आणि भ्रष्टाचारी अशा अनेक समस्या आहेत
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात दुष्काळ, बरोजगारी आणि भ्रष्टाचारी अशा अनेक समस्या आहेत. टँकर वेळेवर पोहोचत नाहीत. दुसरीकडे महागाई वाढत आहे. भ्रष्टाचाराबाबत बोलायला नको, अशा परिस्थितीत ही निवडणूक झाली. आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचे सुख-दु:ख समजून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील जनतेने दडपशाहीला नाकारलेलं आहे. महागाई, बरोजगारीला मतदारांनी नाकारलेलं आहे. त्यामुळे मी बारामतीतील सर्वांचे नतमस्तक होऊन आभार मानते. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्यावर प्रचंड जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे कालपासूनच आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत. काल इंडिया आघाडीची बैठक होती. त्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो.
मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात लढत नाही, माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती
मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती. माझी लढाई बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार घेण्याचा अधिकार आहे. या देशात टॅलेंटची कमी नाही. लोकांनी आम्हाला यावेळी झुकत मापं दिलं आहे. लोकांनी इंडियासाठी विश्वास दाखवला. ममतादीदींबाबतही यांनी घोषणा दिल्या की आम्ही 25 पेक्षा जास्त जागा आणणार, पण असं झालं नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.