ST Workers Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम, अन्यथा... ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ सरसावलंय. रोजंदारीवर काम करणाऱ्या दोन हजार २९६ कामगारांना एसटी महामंडळानं सेवा समाप्तीची कारणं दाखवा नोटीस बजावलीय. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावं, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असं त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीत म्हटलं आहे. एसटी महामंडळानं आतापर्यंत दोन हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी काल कामावर हजर झाले. काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एसटीच्या ६६ बसेस राज्याच्या विविध भागांमध्ये सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी त्यामधून प्रवास केला आहे. दरम्यान एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.