World Heritage Solapur : सोलापूरच्या हिप्परगा तलावाला जागतिक वारसा दर्जा!
सोलापुरातील हिप्परगा तलाव, ज्याला एकरुख प्रकल्प असेही ओळखले जाते, याला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोग (ICID) ने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. हा प्रकल्प 154 वर्षे जुना असून ब्रिटिशकालीन आहे. 1871 साली सोलापुरातील हिप्परगा गावात आदिला नदीवर तत्कालीन ब्रिटिश सरकारने हा तलाव बांधला होता. या प्रकल्पामुळे अकरा गावांतील 1229 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. प्रकल्पाची क्षमता जवळपास तीन टीएमसी आहे. तलावाची उभारणी आणि जॅकवेलचे मजबूत बांधकाम ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. 1930 पासून सोलापूर शहरालाही या प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. 1868 साली या प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि 1871 साली ते पूर्ण झाले. सोलापूर शहर त्यावेळी महाराष्ट्रात औद्योगिकीकरणात चौथ्या क्रमांकावर होते, त्यामुळे भविष्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पाला आता जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.