Solapur : चोरीचा गेलेला 7 कोटींचा ऐवज परत, ऐवज मिळाल्याने तक्रारदारांना सुखद धक्का
सोलापूर पोलीस अधीक्षकांच्या ऑपरेशन स्वच्छता अभियानामुळे चक्क चोरीला गेलेला जवळपास 7 कोटींचा माल पोलिसांनी तक्रारदारांना परत केल्याने एक सुखद धक्का अनुभवायला मिळत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिसात 7 डिव्हिजन असून गेल्या काळात चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी चोरीला गेलेला कोट्यवधी रुपये किमतीचा माल रिकव्हर केला होता. न्यायालयात या चोरांना शिक्षा लागल्यावर हा माल परत देण्याची प्रक्रिया पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबवली आणि तक्रारदारांना त्यांचा चोरीला गेलेला माल समारंभपूर्वक परत देण्यास सुरुवात केली.
काल पंढरपूर डिव्हिजन मध्ये तब्बल 33 तक्रारदारांच्या चोरीला गेलेला 1 कोटी 26 लाखाचे मौल्यवान साहित्य पोलिसांनी परत देत या तक्रारदारांना एक सुखद धक्का दिला आहे . या साहित्य मध्ये सोने चांदीचे दागिने , रोकड रक्कम, किमती मोबाईल, दुचाकी, चार चाकी आणि इतर महत्वाच्या किमती मालाचा समावेश आहे. अशा पारदर्शक कामकाजामुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास वाढतो त्यामुळे ऑपरेशन स्वच्छता मोहीम सुरु केल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भूमिका आहे. चोरी नंतर आम्ही आमचा चोरीला गेलेला मौल्यवान माल परत मिळायची आशा सोडून दिली होती मात्र आज हा माल पुन्हा मिळाल्याने आम्हाला सुखद धक्का बसल्याचे एका तक्रारदाराने सांगितले.