Mangeli Waterfall : सिंधुदुर्गतल्या तिलारी खोऱ्यातील मांगेली धबधबा प्रवाहित
पावसाळा सुरु झाल्यापासून सह्याद्रीच्या कुशीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे अनेक धबधबे मनमुराद पणे मुक्त हस्ताने कोसळत आहेत. आनंदाचे असंख्य क्षण घेऊन कोसळणारा हा मांगोलीचा धबधबा पर्यटकांसाठी कायमच पर्वणी ठरतो. त्यातील एक म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील ‘मांगेली धबधबा’. मांगेली धबधबा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्याच्या सीमेवर आहे. कर्नाटक आणि गोवा या राज्याच्या सीमेवरून हा धबधबा 250 फूटांवरून मनमुरादपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेली गावात कोसळतो. सध्या हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मांगेली धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव करण्यात आलेला आहे. तरी देखील काही अतिहौशी पर्यटक छुप्या मार्गाने मांगेलीतील या धबधब्यावर येत असतात. अशा अतिहौशी पर्यटकांना आळा घालण्यासाठी मांगेली ग्रामपंचायतीने पाचशे रुपयाचा दंड बसवण्याचे ठरवले, असून त्या ठिकाणी दोडामार्ग पोलीस सुद्धा गस्त घालताना पाहायला मिळत आहेत. यंदाही कोरोनामुळे पर्यटन हंगाम पूर्णपणे ठप्प झाल्याने या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत कोसळणारा हा धबधबा जिल्ह्यासहित गोवा कर्नाटक या ठिकाणच्या पर्यटकांचे प्रमुख केंद्र मानलं जातं. कोरोनामुळे यंदाही पर्यटकांना याठिकाणी पर्यटनासाठी मज्जाव करण्यात आलेले आहे. मांगेली धबधब्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या धबधब्याच्या पायथ्याशी न जाता उंचावरून पडणाऱ्या या धबधब्याचे तूषार धबधब्यापासून 250 ते 300 मीटर लांबपर्यंत येत असतात. त्यामुळे या ठिकाणी धबधब्याच्या पायथ्याशी न जाता पर्यटकांना भिजण्याचा आनंद घेता येतो.