Trimbakeshwar : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी
पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. भाविकांना एक ते दोन तास रांगेत उभे राहून त्र्यंबकराजाचे दर्शन मिळत आहे. शिर्डीहून सायकलवरून आलेल्या वीस भाविकांनी काल सकाळी शिर्डीहून निघून काल संध्याकाळी त्र्यंबकेश्वर गाठले आणि सकाळी रांगेत लागून दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टकडून भाविकांसाठी विविध व्यवस्था आणि सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच, पोलिसांकडून देखील सुरक्षेची खास खबरदारी घेतली जात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज आहे. पुढील चारही श्रावणी सोमवार मंदिर पहाटे चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.