नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प : सामना

Continues below advertisement

कंगना रनौतनं शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपला शिवसेनेनं पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. शेतकऱ्यांचा अवमान झाल्यावर तरी भाजपनं तोंडावरचे मास्क काढावे अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. अन्नदात्या शेतकऱ्याला भाजप समर्थक मोदीभक्त नटीनं आतंकवादी ठरवलं. किसानांचा हा अपमान, सिमेवरील जवानांचा तसेच स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या लाखो कष्टकऱ्यांचा अवमान आहे. त्या अवमानावरती नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तरी इतिहास त्यांना माफ करणार नाही, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी 'आतंकवादी' किंवा 'दहशतवादी' आहेत, असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत, असे म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. 'बाबर' सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरवले, असं म्हणत सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram