Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Cabinet Meeting Shinde Camp Shivsena: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे आकाराला येत असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. याच अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटाच्या (Shivsena) मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) नियोजित बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट बैठक होते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला यापैकी एकही मंत्री गेला नाही. केवळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या उर्वरित मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. कॅबिनेटची बैठक आटोपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दालनात पोहोचले. या दालनात सध्या देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा सुरु आहे, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.