Shirdi : शिर्डीच्या साई संस्थान विश्वस्त मंडळ आज जाहीर होणार?
दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होऊन शिर्डी देवस्थानाचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूरचं अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय झाला. यानंतर शिर्डी विश्वस्त मंडळाची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाली. मात्र राज्य सरकारने औरंगाबाद उच्च न्यायालयात दोन आठवड्यांची मुदतवाढ घेतली. आज ही मुदतवाढ संपली असून राज्य सरकार आज विश्वस्त मंडळ जाहीर करणार का याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या या यादीतील अनेक नावांवर आक्षेप घेण्यात आला होता. याच बरोबर स्थानिक ग्रामस्थांना जास्त संधी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या यादीत स्थानिकांना डावलल्यानं स्थानिक ग्रामस्थसुद्धा नाराज होते तर स्थानिक सेनानेत्यांनासुद्धा डावलल्याने स्थानिक नेत्यांनी यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशी मागणी पक्षाचे नेतृत्वाकडे केली होती. आता दोन आठवड्यांची मुदत संपल्याने राज्य सरकार आज विश्वस्त मंडळ जाहीर करणार का? हे पाहावे लागेल. या प्रकरणी उद्या 7 जुलैला औरंगाबाद उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसल्यानं शिर्डी विश्वस्त मंडळाचे काम चार सदस्यीय समितीमार्फत करण्यात येत आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीकडून कारभार सुरू असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विश्वस्त मंडळ जाहीर होईल अशी अपेक्षा होती मात्र दोन वर्षे उलटूनही विश्वस्त मंडळ नियुक्त न केल्याने शिर्डीतील याचिकाकर्त्यांना थेट औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आणि विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी केली होती.