Maharashtra Flood | केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे, मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार
राज्यात अतिवृष्टीमुळं आलेलं आताचं संकट अस्मानी आहे. त्याचे दीर्घकाळ परिणाम होतील. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, दीर्घ परिणाम करणारं हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत तुमच्यामध्ये आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची ताकत नसते, तेव्हा सरकारची ताकत उभी करावी लागते. ती आम्ही उभा करू. केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे. राज्याच्या मर्यादा आहेत. भूकंपाच्या वेळी मी काही दिवस या भागात फिरत होतो. त्यावेळी पैसे उभे केले. जागतिक बँकेतून पैसे आणले. महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा मदत केली. त्यावेळी मी करू शकलो. आत्ता त्या संकटाला राज्य सरकारची एकट्याची ताकत आहे, असं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.