Sharad Pawar on Ajit Pawar Pink Jacket : मग लगेच महिला अट्रॅक्ट होतील का? गुलाबी जॅकेटवरुन टोला
Sharad Pawar on Ajit Pawar Pink Jacket : मग लगेच महिला अट्रॅक्ट होतील का? गुलाबी जॅकेटवरुन टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे(SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) विधानसभेच्या तयारीला लागले असून रविवारी त्यांनी सोलापूर दौऱ्यात आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्याचं दिसून आलं. या दौऱ्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांना शरद पवारांना भूमिका स्पष्ट करण्याबाबत विचारणा केली. तर, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन, त्यांची भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर, शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच, यावेळी अजित पवारांच्या (Ajit pawar) गुलाबी जॅकेट आणि त्यांच्या राष्ट्रवादीचा गुलाबी माहोल यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, शरद पवारांनी मिश्कीलपणे पवारस्टाईल उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष निर्माण झाले असून दोन्ही पक्ष सध्या विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगदी पेहराव बदलण्यापासून तयारी केल्याचं दिसून आलं. गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी गाडी आणि माहोल गुलाबी करुन ते सध्या लाडकी बहीण योजनेबाबत सर्वत्र जागृती करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना या गुलाबी रंगाचा फायदा होईल का, विधानसभेला महिला वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होईल का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, शरद पवारांनी त्यांच्यास्टाईलने उत्तर दिले. शरद पवारांना हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्यामुळे, तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का, असा प्रतिप्रश्न विचारत शरद पवारांनी मिश्कील टोला लगावला, त्यामुळे पत्रकारांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. तसेच, अजित पवारांच्या बदलत्या रंगाच्या भूमिकेचा त्यांना फायदा होणार नाही, असेच पवारांनी सूचवलं आहे.