Sharad Pawar: मनुस्मृती आणि मनाचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याच्या चर्चा, शरद पवार म्हणाले
मुंबई: राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरु आहे, ही गोष्ट माझ्या कानावर आली. यावरुन राज्य सरकारची संविधानाच्या (Indian Constitution) बाबतीत काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. याबाबत प्रागतिक विचाराचे जे कोणी लोक आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भग्वद्गीता, मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करुन देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी गीता आणि मनाचे श्लोक तर मानवी मूल्ये आणि स्वभाववृत्ती यांची ओळख करुन देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे.