Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
गेल्या चार - पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पुर आला आहे. विशेषतः तालुक्यातून वाहणाऱ्या भांगरी आणि भातसा नदीला आज पहाटेच्या सुमारास पूर आला. त्यातच शनिवार व रविवार सुट्टीचा बेत आखून मुंबईहून पावसाळी सहलीसाठी शहापूर तालुक्यातील वाशिंद गावाच्या नजीक असलेल्या एका फार्म हाऊसवर जवळपास 150 हून अधिक पर्यटक आले होते. हे पर्यटक पहाटेच्या साखर झोपेत असतानाच नदीला पूर आला आणि पुराच्या पाण्यानं सृष्टी फार्म हाऊसला वेढा घेतला. हे पुराचं दृश्य पाहून एका पर्यटकानं जिल्हा आप्पती व्यस्थापन कक्षात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच ठाण्यावरुन एनडीआरएफ पथकातील 40 जवानांनी घटनस्थळी दाखल होऊन रेस्क्यू ऑपरेशन करत 150 हून अधिक पर्यटकांना बोटीच्या मदतीनं पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.