ज्येष्ठ नाटककार, पत्रकार Jayant Pawar यांचं निधन; वयाच्या 61 व्या वर्षी अखेरचा श्वास : ABP Majha
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार (Marathi Writer Jayant Parwar) यांचं निधन झालं आहे. जयंत पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते.
पवार यांनी लिहिलेल्या नाटकांनी तसेच कथांनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला आहे. पवार यांचा फीनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ हा मराठी चित्रपट बनला आहे. तसेच ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर ‘रज्जो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला आहे.
2014 सालच्या महाड येथे झालेल्या 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील.
जयंत पवार यांनी वंश, अधांतर, माझं घर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन अशी नाटके केली आहेत. तसेच 15 एकांकिका लिहिल्या आहेत. कार्य सिद्धीस जाण्यास समर्थ आहे, होड्या, घुशी या त्यांच्या एकांकिकेचे शेकडो प्रयोग झाले आहेत.