Saudi Aramco Refinary : कोकणातल्या रिफायनरीचं काय होणार? चीनसोबत करार झाला, बरसूचं काय?
कोकणातल्या रिफायनरीमध्ये सौदी अरामको या कंपनीची जास्त गुंतवणूक असणार आहे. शिवाय रिफायनरी प्रकल्पासाठी लागणारे कच्च तेल सौदी अरामको पुरवणार आहे. पण याच कंपनीने आता चीनमध्ये नवीन रिफायनरी उभारण्यासाठी आणि आणखीन एका प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी चीन सोबत करार केला आहे. चीनच्या ईशान्य प्रांतातील लिओनिंगमध्ये तेल शुद्धीकरण कारखाना सौदी अरामको उभारणार आहे. यासाठीचा करार पूर्ण झाला असून 2026 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. पण उलटपक्षी कोकणात 2016 मध्ये झालेल्या रिफायनरीचं घोडं स्थानिकांच्या विरोधामध्ये अद्यापही अडलेलं आहे. त्यामुळे जर का कंपनीने चीनमध्ये गुंतवणूक केल्यास कोकणातल्या रिफायनरीचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी रद्द झाल्यानंतर ती बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारण्यासाठी चाचपणी सुरू आहे. पण स्थानिकांच्या विरोधामुळे त्यामध्ये फारशी प्रगती दिसून येत नाही. शिवाय कोकणात उभारला जाणारा रिफायनरी प्रकल्प हा पूर्वीपेक्षा कमी क्षमतेचा असणार आहे. त्यामुळे आता सौदी अरामकोच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.