Sanjay Raut On PM Candidate : निकालाच्या 15 मिनिटांनंतर आघाडीचा पंतप्रधान कोण ते ठरेल : संजय राऊत
मुंबई : काल लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) मतदान संपताच विविध माध्यमांतून एक्झिट पोल (Exit Poll 2024) जाहीर करण्यात आहे. यात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, एक्झिट पोलमध्ये सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. कारण मोदींनी एवढे मोठे ध्यान केले आहे. मोदींनी साधना केली, तपस्या केली. त्याप्रमाणे 360 आणि 370 जागा काहीच नाहीत. मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा तरी मिळाल्या पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागले, टीका त्यांनी केली.
ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही
ते पुढे म्हणाले की, अत्यंत फसवणुकीचा हा एक्झिट पोल आहे. गेल्या काही वर्षात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल चुकीचे ठरत आहेत. भारतीय जनता पक्ष, गृह मंत्रालय आणि यंत्रणा कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे हे सर्वांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की, गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 24 तासात किमान 180 जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळजवळ धमकावले आहे. जर तुम्हाला जिंकण्याची खात्री असेल तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाही. धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार आहे.