Monsoon Loss | आमच्या बांधांवर कधी येणार? सांगलीच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल
सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या दुष्काळी तालुक्यात कधी नव्हे तो ओला दुष्काळ सारखी परिस्थिती झाली आहे. आटपाडी तालुक्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे सलग 2 महिन्यात अतिवृष्टी झालीय. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसात डाळींबाचे मोठे नुकसान झाले असतानाच पुन्हा ऑक्टोबर मध्ये झालेला परतिचा पाऊस डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्धवस्त करून गेला आहे. यामुळे आटपाडी तालुक्यातील हजारो हेक्टर वरील डाळिंब हंगाम या अस्मानी संकटाने वाया जाणार आहे. कधी नव्हे ते यंदा 18 सप्टेंबरच्या आसपास सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याने बहुतांश डाळिंब बागांमध्ये फळधारणा झालेली नव्हती. त्यात पुन्हा लगेच ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा या डाळिंब बागांना तडाखा दिला . यामुळे ज्या ज्या बागा सप्टेंबरमधील पाऊसात वाचल्या होत्या त्या या महिन्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडल्या. आता तर अजून डाळीब शेतीत पाणी साचून आहे. रोगाचे आक्रमण सुरु झालंय. यामुळे आताचा हंगाम वाया जाणार आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान सहन केलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकरी मोठया संकटात आहे. शेतीच्या इतिहासात यावर्षी सर्वाधिक विक्रमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .